

जमीन, घर खरेदी आणि खरेदीखत मुहूर्त 2026
आज जमीन-घर खरेदी किंवा खरेदीखतासाठी शुभ मुहूर्त आहे का?
आज, १० नोव्हेंबर, २०२६ रोजी शुभ मुहूर्त नाही. पुढच्या शुभ तारखा खाली पाहा.
पुढच्या शुभ तारखा
- १२ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार): ०२:१९ PM - ०६:४८ AM, १३ नोव्हेंबर
- १३ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार): ०६:४८ AM - ०६:४९ AM, १४ नोव्हेंबर
- १९ नोव्हेंबर २०२६ (गुरुवार): ०६:५२ AM - ०६:५२ AM, २० नोव्हेंबर
नोव्हेंबर
२०२६
📝 नोट्स
-
कॅलेंडरमध्ये काही तारखांच्या खाली रंगीत बिंदू दिसतात. हे बिंदू सांगतात की तो दिवस कोणत्या प्रकारचा शुभ दिवस आहे:
निळा बिंदू: गृह प्रवेश (नवीन घरात जाण्यासाठी) शुभ दिवस.लाल बिंदू: विवाह सोहळ्यासाठी शुभ दिवस.हिरवा बिंदू: वाहन खरेदीसाठी शुभ दिवस.पिवळा बिंदू: जमीन किंवा मालमत्ता खरेदीसाठी शुभ दिवस. - जर एखाद्या तारखेला एक किंवा अधिक बिंदू असतील, तर त्या दिवशी त्या कार्यांसाठी मुहूर्त उपलब्ध असतो.
- अधिक माहिती पाहण्यासाठी त्या तारखेवर क्लिक करा. पॉपअपमध्ये मुहूर्त वेळ, तिथी आणि इतर माहिती दिसेल.
- हे तुम्हाला भारतीय परंपरेनुसार महत्त्वाच्या प्रसंगांसाठी सर्वोत्तम तारखा निवडण्यास मदत करते.
जमीन खरेदी मुहूर्त: थोडक्यात
जमीन, प्लॉट, फ्लॅट किंवा घर घ्यायचे असेल तर घरातले जाणते लोक आणि गुरुजी आधी हेच सांगतात की खरेदीखत गुरुवारी किंवा शुक्रवारी करा. नक्षत्र स्थिर किंवा मृदू असावे, तिथी शुद्ध असावी आणि सही राहुकाळाबाहेर व्हावी, एवढे पाहायचे. वरच्या महिनावार तक्त्यात २०२६ च्या ज्या तारखा आहेत, त्या तुमच्या शहरानुसार हे सगळे नियम तपासूनच दिल्या आहेत.
- शुभ वार: गुरुवार आणि शुक्रवार. आमच्या कॅलेंडरमध्ये मालमत्तेसाठी फक्त हे दोनच वार येतात.
- शुभ नक्षत्रे: आधी रोहिणी, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा. नंतर मृग, पुनर्वसू, पुष्य, अनुराधा, रेवती, मूळ, पूर्वाषाढा आणि पूर्वा भाद्रपदा.
- काय टाळावे: अमावास्या, चतुर्थी, नवमी, चतुर्दशी (रिक्ता तिथी) आणि त्या दिवसाचा राहुकाळ. घरात पाळत असाल तर खरमास, पितृपक्ष आणि अधिक मासही.
- सगळ्यात महत्त्वाचा मुहूर्त: खरेदीखताचा, कारण कायद्याने मालकी त्याच दिवशी तुमच्या नावावर होते.
खरेदीखत शुभ दिवस: कोणता वार चांगला?
गुरुवार आणि शुक्रवार. गुरुवार गुरूचा वार, जो वाढ आणि टिकाऊपणा देतो. शुक्रवार शुक्राचा, आणि शुक्र घर, सुखसोयी आणि मालमत्तेचा कारक आहे. गुरूमुळे जागा टिकून राहते आणि शुक्रामुळे त्या घरात सुख नांदते. याच कारणाने बहुतेक पंचांगांत, आमच्याही, जमीन-घराचे मुहूर्त याच दोन वारी ठेवलेले असतात.
बाकीचे वार का नाहीत, हे घरातल्या मोठ्यांना चांगले माहीत असते. मंगळवार मंगळाचा. मंगळ भूमीचा कारक खरा, पण त्याचा वार भांडण-तंट्याशी जोडलेला मानला जातो, आणि बांधावरून कोर्टकचेरी कोणालाच नको असते. शनिवारी शनीमुळे काम रखडण्याची भीती असते, फेरफार अडकेल किंवा ताबा आणि कर्ज वर्षानुवर्षे लांबेल याची. रविवार सूर्याचा उग्र वार, आणि तसेही दुय्यम निबंधक कार्यालय त्या दिवशी बंद असते. सोमवार आणि बुधवारात काही वाईट नाही, पण जमीन-घरासाठी लोक सहसा हे वार निवडत नाहीत.
कार्यालयातून दुसऱ्या वाराची वेळ मिळाली तर?
असे बऱ्याच वेळा होते, विशेषतः बँक किंवा बिल्डर तारीख ठरवतो तेव्हा. आधी पुढच्या दोन-तीन आठवड्यांत गुरुवार किंवा शुक्रवारची वेळ मिळते का ते पाहा; ऑनलाइन अपॉइंटमेंटमध्ये रिकाम्या वेळा दिसतात. तारीख बदलताच येत नसेल तर किमान सही आणि बायोमेट्रिक राहुकाळाबाहेर, शुभ, लाभ किंवा अमृत चौघडियात ठेवा, आणि त्या दिवशी अमावास्या किंवा रिक्ता तिथी नाही ना, हे पाहा. सोबत इसार आणि साठेखत एखाद्या चांगल्या गुरुवार-शुक्रवारच्या मुहूर्तावर करून घ्या, म्हणजे व्यवहाराची सुरुवात तरी शुभ होईल.
जागा-घर घेण्यासाठी शुभ नक्षत्र आणि तिथी
जमीन पिढ्यान्पिढ्या राहणारी, म्हणून पहिली पसंती स्थिर नक्षत्रे: रोहिणी, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा आणि उत्तरा भाद्रपदा. यांत सुरू केलेले काम टिकते असे जुने लोक सांगतात, आणि मुलांच्या हाती द्यायच्या घराकडून दुसरे काय हवे?
स्थिर नक्षत्रे दर वेळी गुरुवार-शुक्रवारी येत नाहीत, म्हणून मुहूर्त ग्रंथ आणखी काही नक्षत्रे मान्य करतात:
| गट | नक्षत्रे | का शुभ |
|---|---|---|
| स्थिर | रोहिणी, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, उत्तरा भाद्रपदा | स्थैर्य; पहिली पसंती |
| मृदू | मृग, अनुराधा, रेवती | व्यवहार सुरळीत, घेणारा-देणारा यांच्यात कटुता नाही |
| चर / क्षिप्र | पुनर्वसू, पुष्य | कुटुंबासाठीची खरेदी; पुष्य सर्वात खात्रीचे |
| मालमत्तेसाठी मान्य | मूळ, पूर्वाषाढा, पूर्वा भाद्रपदा | पंचांगाच्या मालमत्ता नियमांत येतात, म्हणून वरच्या तक्त्यात दिसतात |
तिथीमध्ये शुक्ल पक्ष अधिक चांगला. द्वितीया, तृतीया, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, त्रयोदशी आणि पौर्णिमा चालतात. चतुर्थी, नवमी आणि चतुर्दशी यांना रिक्ता म्हणजे "रिकामी" तिथी म्हणतात. आयुष्यातली सगळ्यात मोठी खरेदी ज्या दिवसाच्या नावातच रिकामेपण आहे त्या दिवशी का करायची? अमावास्याही याच कारणाने टाळतात.
इसार, साठेखत, खरेदीखत की ताबा: मुहूर्त कशाचा पाहायचा?
सगळ्यात आधी खरेदीखताचा. इसार कधीही दिलेला असो, कायद्याने मालक तुम्ही त्या दिवशी होता ज्या दिवशी खरेदीखताची दस्त नोंदणी होते. बरेच लोक इसारासाठी छान मुहूर्त काढतात आणि खरेदीखताची जी तारीख बिल्डर देईल ती मान्य करतात. खरे तर याच्या उलट करायला हवे. आधी खरेदीखताचा मुहूर्त पक्का करा आणि बाकी सगळे त्याप्रमाणे लावा.
| टप्पा | मुहूर्त किती गरजेचा | काय करावे |
|---|---|---|
| खरेदीखत / दस्त नोंदणी | सर्वात जास्त | दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ अशी घ्या की सही मुहूर्ताच्या आत होईल |
| इसार / टोकन | दुसऱ्या क्रमांकावर | व्यवहार इथूनच सुरू होतो; पूर्ण मुहूर्त नसेल तर राहुकाळाबाहेरचा गुरुवार-शुक्रवार पुरेसा |
| साठेखत | दुसऱ्या क्रमांकावर | बऱ्याचदा इसारासोबतच होते; तोच नियम |
| ताबा / किल्ली | तिसऱ्या क्रमांकावर | राहायला जाण्यासाठी गृहप्रवेश मुहूर्त वेगळा पाहा |
| कर्ज मंजुरी, ई-मुद्रांक | गरज नाही | कोणताही कामाचा दिवस |
प्लॉट, फ्लॅट, बंगला की दुकान: फरक काय?
प्लॉट घ्या की फ्लॅट, पंचांगाचे नियम तेच राहतात. फरक खरेदीनंतरच्या कामांत येतो.
- जमीन किंवा प्लॉट: खरेदी हे पहिले पाऊल. पाया घालताना भूमिपूजनाचा मुहूर्त वेगळा पाहिला जातो, आणि पहिली खणणी साधारणपणे ईशान्य कोपऱ्यातून करतात.
- तयार फ्लॅट किंवा घर: आधी खरेदीखत, मग ताबा, मग गृहप्रवेश आणि वास्तुशांती. अनेक कुटुंबे खरेदीखत आणि वास्तुशांती एकाच महिन्यात उरकतात.
- बांधकाम सुरू असलेला फ्लॅट: खरेदीखताला वर्षे लागू शकतात. बुकिंग आणि करारनामा आत्ता मुहूर्तावर करा, आणि इमारत तयार झाल्यावर खरेदीखतासाठी नवा मुहूर्त पाहा.
- दुकान, ऑफिस, गोदाम: तोच गुरुवार-शुक्रवारचा नियम. मुहूर्ताच्या आत व्यापारी मंडळी लाभ किंवा अमृत चौघडियात सही करणे पसंत करतात.
राहुकाळ, खरमास, पितृपक्ष आणि अधिक मास
राहुकाळ रोज साधारण दीड तासाचा असतो. सगळ्यात चांगल्या तारखेलाही त्यात सही करू नका. सकाळी 6 वाजता सूर्योदय धरला तर गुरुवारी दुपारी साधारण 1:30 ते 3:00 आणि शुक्रवारी सकाळी 10:30 ते 12:00 असतो, पण शहराच्या सूर्योदयानुसार सरकतो. नेमकी वेळ आजच्या पंचांगात पाहा.
खरमास सूर्य धनू किंवा मीन राशीत असताना असतो; डिसेंबर-जानेवारीतल्या खरमासाला धनुर्मास म्हणतात. पुढचा खरमास 16 डिसेंबर 2026 ते 14 जानेवारी 2027 (संक्रांतीपर्यंत), आणि त्यानंतर साधारण 15 मार्च ते 14 एप्रिल 2027. अनेक कुटुंबे या काळात खरेदीखत करत नाहीत. पंचांग शुद्धी खरमास आपोआप वगळत नाही, म्हणून 17, 18, 24 आणि 25 डिसेंबर 2026 वरच्या तक्त्यात दिसतील. तुमच्याकडे खरमास पाळत असतील तर 10 किंवा 11 डिसेंबर 2026 घ्या, किंवा संक्रांतीनंतरपर्यंत थांबा.
पितृपक्ष, म्हणजे नवरात्रीआधीचे सोळा दिवस, पितरांसाठी असतात. त्यात नवी खरेदी, जमिनीसकट, सहसा पुढे ढकलली जाते. अधिक मास, जो साधारण दर तीन वर्षांनी येतो, त्यातही मोठी नवी कामे टाळतात.
गुरुपुष्यामृत, रविपुष्य आणि साडेतीन मुहूर्त
पुष्य नक्षत्र गुरुवारी आले की गुरुपुष्यामृत योग होतो. खरेदीसाठी याहून मोठा दिवस नाही, आणि मालमत्तेसाठी वारही आपोआप योग्य ठरतो. जानेवारी 2027 पर्यंत गुरुपुष्य नाही. 2027 च्या तारखा (नवी दिल्ली वेळ):
- 18 फेब्रुवारी 2027: रात्री 9:05 पासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. इसारासाठी ठीक, खरेदीखतासाठी नाही.
- 18 मार्च 2027: पूर्ण दिवस. खरेदीखतासाठी सर्वात चांगला, जरी मार्चच्या खरमासात येतो.
- 15 एप्रिल 2027: फक्त सकाळी, साधारण 9:33 पर्यंत.
- 19 नोव्हेंबर 2027: सूर्योदयापूर्वी, त्यामुळे कार्यालयीन कामासाठी उपयोगाचा नाही.
- 16 डिसेंबर 2027: सकाळी 9:12 पासून, कामाच्या वेळेत मिळणारा.
रविवारी पुष्य असले की रविपुष्य म्हणतात. पुढचा 29 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी साधारण 10:59 पर्यंत आहे. रविवार मालमत्तेचा वार नाही आणि कार्यालयही बंद, म्हणून या दिवशी बुकिंगची रक्कम द्या किंवा कागदपत्रे घरी आणा.
महाराष्ट्रात साडेतीन मुहूर्तांना मोठे महत्त्व आहे: गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी पाडव्याचा अर्धा मुहूर्त. या दिवशी वेगळा मुहूर्त पाहावा लागत नाही, आणि बरेच लोक या दिवशी फ्लॅट बुक करतात. धनत्रयोदशी यंदा शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026 रोजी आहे. आमच्या कॅलेंडरमध्ये ती खरेदीखताची तारीख नाही, कारण त्या दिवशीचे नक्षत्र (हस्त, मग चित्रा) मालमत्तेच्या यादीत नाही, पण इसार देण्यासाठी चांगला दिवस आहे.
दस्त नोंदणीआधी: कागदपत्रांची यादी
मुहूर्त कितीही चांगला असला तरी कागद अपुरे असतील तर दस्त नोंदणी अडकते. हे सगळे आठवडाभर आधी तयार ठेवा:
- विकणाऱ्याचे खरेदीखत आणि त्याआधीच्या खरेदीखतांची साखळी.
- ७/१२ (सातबारा) उतारा आणि ८-अ ताजा, विकणाऱ्याच्या नावावर, आणि फेरफार नोंदी नीट तपासलेल्या.
- वकिलाकडून सर्च रिपोर्ट, शक्य तर 30 वर्षांचा, म्हणजे जमिनीवर बोजा किंवा दावा नाही याची खात्री होते.
- फ्लॅट असेल तर मंजूर नकाशा, ओसी किंवा सीसी, सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र, आणि बांधकाम सुरू असेल तर महारेरा क्रमांक.
- मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी आधीच भरलेली (ई-मुद्रांक किंवा चलन).
- दोघांचे पॅन, आधार, फोटो आणि दोन साक्षीदार. बहुतेक कार्यालयांत आता बायोमेट्रिक होते.
- खरेदीखतानंतर सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी फेरफार अर्ज लवकर करा.
- वेळ अशी बुक करा की सही मुहूर्ताच्या आत होईल, आणि अर्धा-पाऊण तास आधी पोहोचा. मुहूर्त बहुतेक वेळा रांगेतच निघून जातो.
खरेदीखताच्या दिवशी घरी छोटी पूजा
मोठ्या पूजेची गरज नाही. सकाळी अंघोळ करून देवघरात दिवा लावा आणि कागदपत्रांची फाईल गणपतीसमोर ठेवा. झेरॉक्स प्रतीवर (मूळ मुद्रांकावर नाही) हळद-कुंकवाचे छोटे स्वस्तिक काढा आणि काम निर्विघ्न व्हावे अशी प्रार्थना करा. निघताना दही-साखर खाऊन निघा. खरेदीखत झाल्यावर परत येताना देवळात पेढे ठेवा. पहिल्यांदा जागेवर किंवा फ्लॅटवर जाल तेव्हा थोडे गंगाजल शिंपडा आणि दारात नारळ फोडा.
मुहूर्त मिळत नसेल तर काय करावे?
फक्त मुहूर्तापायी चांगली जागा हातची घालवू नका. परंपरेत यावरही उपाय आहे, आणि गुरुजी साधारण याच क्रमाने पाहतात:
- अभिजित मुहूर्त: दुपारी मध्यान्हाच्या आसपास साधारण 24 मिनिटे, जी बहुतेक कामांसाठी पुरेशी मानली जातात. बुधवारी हा घेत नाहीत.
- चौघडिया: तुमच्या शहराच्या चौघडिया मधील शुभ, लाभ किंवा अमृत वेळ निवडा.
- होरा: त्या दिवशी गुरू किंवा शुक्राचा होरा मालमत्तेसाठी चांगला.
काहीही निवडा, राहुकाळ आणि अमावास्या टाळा.
आम्ही हे मुहूर्त कसे काढतो
वरच्या तक्त्यातली प्रत्येक तारीख तुम्ही निवडलेल्या शहरासाठी पंचांग शुद्धीने तपासली जाते. ज्या गुरुवारी किंवा शुक्रवारी नक्षत्र मालमत्तेच्या यादीतले असते आणि तिथी शुद्ध असते तेवढेच दिवस आम्ही ठेवतो, आणि ज्या दिवशी अशुभ योग किंवा करण असतो तो वगळतो. त्याशिवाय काही व्यावहारिक नियमही ठेवले आहेत:
- 5 मिनिटांपेक्षा लहान मुहूर्त दाखवत नाही.
- दिवस सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत धरला जातो, मध्यरात्रीपासून नाही. त्यामुळे सकाळी 6:40 ला संपणारी वेळ आदल्या दिवसाची धरली जाते.
- रात्री 9 नंतर सुरू होणारा मुहूर्त दाखवत नाही, कारण तेव्हा कोणतेही कार्यालय सुरू नसते.
- वेळा तुमच्या ठिकाणावरून काढल्या जातात. मुंबई आणि कोलकात्याच्या सूर्योदयात जवळपास तासाभराचा फरक असतो, म्हणून वेळ बुक करण्याआधी तुमचे शहर निवडा.
यंदा घरात नवी गाडी किंवा लग्नही असेल तर वाहन खरेदी मुहूर्त आणि विवाह मुहूर्त याच पद्धतीने काढलेले आहेत.



